रॉकस्टार

रॉकस्टार हा चित्रपट जितका जनार्धन जाखड (जॉर्डन) चा आहे, तितकाच तो हीर कौरचा पण आहे. किंबहुना जॉर्डन च्या या गोष्टीत हीर चे पात्र एका वेगळ्याच उंचीवर आहे. तिची ती उंची जॉर्डन सुद्धा गाठू शकला नाही.

हीर चार वेगवेगळ्या आपल्याला मानसिक स्थितीत दिसते. आणि ती मानसिक स्थिती ही रॉकस्टार या चित्रपटाचा आत्मा आहे, किंबहुना इम्तियाज अलीच्या या गोष्टीत हीरची एक समांतर गोष्ट चालू आहे. हीर भारतातल्या तमाम एका वर्गाचे प्रतिनिधित्व करते की ज्यांना स्वतःचा स्वभाव हा शेवटपर्यंत कळत नाही किंवा त्यांना दुसराच कोणीतरी लागतो जो त्यांना स्वतःची ओळख करून देईल स्वतःच्या कोशातून बाहेर काढून देईल.

हीरची चित्रपटातली पहिली ओळख ही “नीट अँड क्लीन” फाईन लेडी अशा स्वरूपात आहे. अतिशय श्रीमंत कुटुंबातली अशी हीर आहे. हेच ते दाखवण्याचे दात. खरं हीर चा स्वभाव हा जॉर्डन च्या सहवासात आल्यानंतरच कळतो. अंगातली मस्ती… हीरच्या भाषेतले किडे बाहेर काढणारे. याच प्रसंगाचे रूपक “फाया कुन” या गाण्यात घेतलेले आहे.

    कर दे मुझको तु मुझसे ही रिहा……

इथे जॉर्डन हीरला तिच्या कोषातून बाहेर काढतो आणि हीर जॉर्डनला त्याच्या कोषातून बाहेर काढते.

हीरच्या लग्नाच्या प्रसंगात ती जॉर्डनच्या प्रेमात पडली होती पण तो कोश ना हीर तोडू शकली ना जॉर्डन. हाच तो दुसरा कोष समाजाचा. लग्न दुसर्‍याशी केले आणि अक्षरशः सत्व हरवून बसली. ह्या प्रसंगात तिचे मन अक्षर लंबका सारखे हिंदोळे घेत होते काही प्रसंगात ती जॉर्डन बरोबर पळून जाते की काय असेच वाटत होते, हीच तिची तिसरी मानसिक स्थिती होती. आणि बरोबर येथेच जॉर्डन आपल्या अवतीभवती चे सगळेच कोश तोडतो आणि मुक्त पक्ष्यासारखे भ्रमण चालू करतो.

  शहर एक से गांव एक से
  लोग एक से नाम एक से 
  फिर से उड चला…. मै..

हीरची चौथीत मानसिक स्थिती ही प्रागमध्ये दिसली स्वत:ची ओळख झाली होती पण सामाजिक बंधनांमुळे एक प्रकारचा वेगळाच कोषात अडकून पडण्याची स्थिती.. “हवा हवा” हे गाणं तर अक्षरशः हीरच्या या स्थितीला रूपक म्हणून वापरलेले आहे

 हवा हवा राणी हवा
 सोने की दिवारे मुझे खुशी ना ये पाये
 आजादी दे दे मुझे मेरे खुदा
 ले ले तू दौलत और कर दे रिहा

आणि येथे परत आडवी येते ती सामाजिक पत नि इभ्रत. येथे सर्व कोश तोडलेला जॉर्डन आणि अर्धवट कोषात अडकलेली हीर. आणि खऱ्या अर्थाने जॉर्डन पण याच कोषात अडकतो, पण हा कोश तोडू शकत नाही कारण तो हीरचा असतो.

 मेरे बेबसी का खयाल
 बस चल रहा है घडी
 तुझे छीन लू या छोड दु
 मांग लू या मोड दू

आणि शेवटी ती अगदी ठरवून भांडण करते आणि आतून पूर्णपणे तुटते ती परत न उभी राहण्यासाठी. स्वतःभोवती चा शेवटचा कोश तोडता न आल्याने ती स्वतः तुटते. चित्रपटात ही येथेच मरते आणि नवा जॉर्डन चा नवा जन्म होतो.

तुम लोगो की इस दूनिया मे
हर कदम पर इन्सान गलत
मै सही समज के जो भी करू
तुम केहते हो गलत 
मर्जी से जीने की 
क्या तुम सबको अर्जी दू

इम्तियाज अलीचा हा चित्रपट इतर सर्व चित्रपटांपेक्षा येथेच वेगळा ठरतो. दोन गोष्टी यात दाखवलेल्या आहेत आणि दोन्ही अतिशय ठळक आहेत. त्या अतिशय सुंदर पद्धतीने संगीतात आणि त्यापेक्षा गाण्यात गुंफल्या आहेत. दोन प्रकारच्या मानवी मनाच्या गोष्टी….

प्रवर्ग: Uncategorized

नाईन्टीन नाईन्टी – सचिन कुंडलकर

आपली जडणघडण होताना, खरंतर आपण खूप शिकत जातो आणि आपल्याला शिकवायला जो गुरू मिळतो तो गुरू हा सदैव आपल्या सभोवताली असतो पण तो प्रत्यक्षपणे आपल्याला शिकवत नाही त्याची शिकवायची पद्धत खूप वेगळी असते तो शिकवतो ते अनुभवांमधून, एखाद्या प्रसंगातून आणि तोच अनुभव व तोच प्रसंग पकडायला आपण शिकले पाहिजे आणि हे करणे जमले नाही तर त्या गुरुजी शाळेत आपण सदैव नापास होऊ.

हेच  सचिन कुंडलकर नी आपल्या नाईंटीन पुस्तकात सांगितले आहेत. हे पुस्तक म्हणजे सचिन कुंडलकर यांचे तारुण्यातील अनुभवाच्या जडणघडणीचे लेखन चित्र. या पुस्तकात सचिन कसा घडला, तो घडताना आजूबाजूच्या प्रसंगांनी कसा हातभार उचलला, सजीव-निर्जीव, गाणी, संगीत, चित्रपट ,पुस्तके, उगाच फिरत-फिरत कळालेल्या गोष्टी या सगळ्यांचे जंत्री त्या पुस्तकात आहे. कोणाला काही उपदेश केला नाही फक्त कागदावर उतरवले आहे की मला काय वाटले, त्या माझ्या गोष्टीचा कसा परिणाम झाला आहे.

पहिल्याच प्रकरणात सचिनने या पुस्तकात काय आहे याची झलक दाखवली आहे. अगदी थोडक्यात मी कसा घडलो, शाळेत असताना माझे भावविश्व काय होते, माझ्या आजूबाजूच्या मुलांचे भावविश्व काय होते हे प्रसंग रेखाटले आहेत.

माणूस एका दशकामुळे घडवला जातो ओळखला जातो आणि त दशक माणसाच्या पालन पोषण करते काही काळाने ते दशक त्या माणसाची मर्यादांमध्ये त्याची जाणीव जुनी बनवते.

हिच्या पुस्तकाची टॅगलाईन म्हणता येईल. एका प्रसंगात तो सांगतो की विजय मेहता, श्रीराम लागू , सतीश दुभाषी वगैरे मला आवडत नाहीत कारण त्यांना पाहिलेच नाही. त्यांचे काम काय हे मला माहित नाही. माझे सतरा वर्षांचे आयुष्य हे बच्चन, विनोद खन्ना यांच्या सिनेमे बघण्यात गेले आहे. या प्रकरणात अशा अनेक गोष्टींचा उल्लेख आहे की ज्याची स्वतंत्र प्रकरणे पुढील पुढील पुस्तकात आहेत. थोडक्यात म्हणजे आपला देश आणि स्वतः सचिन या भागातून डिजिटल युगात कसे आले याचे वर्णन या लेखात आहे.

नंतरची दोन प्रकरण आहेत इस्तांबुल आणि पॅरीस वास्तव्याची. इस्तांबुल मध्ये फिरायला गेलेला आणि पॅरिस मध्ये शिकायला गेलेल्या सचिन अतिशय सुंदर केले आहे विशेषता वाचलेल्या पुस्तकानुसार तुर्की लेखक प्रमुख हे शहर कसे आहे तसेच एखादे शहर कसे बघावे याचे उत्तम उदाहरण ह्या दोन प्रकरणात केलेले आहे सचिनने भारतीय मध्यमवर्गी असणाऱ्या ला एक वेगळीच किनार दिली आहे.पॅरिसमधल्या मित्रांचे अनुभव ऐकून बंड करायला निघालेल्या सचिन, अॅमस्टरडॅममध्ये सेक्स सगळे समोर असताना मागे फिरणारा सचिन आणि मी कोण आहे याची जाणीव झाली तर रडणार सचिन दिसतो
मित्रांनी चिडल्यावर स्वतःचा आलेला राग पुण्याचा शाळेचा मराठी कवितांचा साने गुरुजींचा एलआयसी जीवन विमा बँक ऑफ इंडिया निरमा पावडर अमूल आणि चितळे यांचा आलेला राग आणि ह्या गोष्टींनी बनवलेल्या हुशार शिस्तप्रिय मुलाचा राग दाखवला आहे. हुशार शिस्तप्रिय चांगला मुलगा बनवून मी काय मिळवलेले आहे हाच प्रश्न तो स्वतःला विचारत होता.नव्वदीच्या दशकामध्ये असणाऱ्या अनेक तरुणांच्या या भावना त्यांनी ते व्यवस्थित चित्रित केले आहेत.

नंतरच्या प्रकरणांमध्ये घराविषयी च्या कल्पना, स्वयंपाकाविषयीच्या, कल्पना एकट्याने राहण्याविषयीच््या कल्पना, या सचिनने अतिशय सुंदरपणे सांगितलेले आहेत. माणसामाणसात फरक आहे.हे अतिशय सुंदर पद्धतीने सांगितला आहे.  आपल्या जीवनात झालेला बदल निर्माण झालेली बंडखोरीची भावना आणि संगीताने त्यावर केलेली मात या गोष्टी पुढील तीन प्रकरणात त्यांनी सांगितले आहेत.आपण जसे मोठे होतो तसे आपल्या आजूबाजूच्या गोष्टी कशा बदलत जातात. शहर कसे बदलते, संगीत कसे बदलते. जतीन-ललित पासून ए आर रहमान पर्यंतचा प्रवास हा नव्वदच्या दशकामध्ये घडलेला त्यांनी दाखवलेला आहे.

एखाद्या एखाद्या चित्रपटाच्या निमित्ताने केलेले पुण्याचे वर्णन, पुणेरी माणसाच्या स्वभावाचे वर्णन फलक झालेले आहे.मूळचा पुणेरी असायला सचिन बऱ्याच वर्षांनी पुण्यात आल्यानंतर झालेला बदल अतिशय डोळसपणे व्यक्त करतो. पुण्यात बाबासाहेब पुरंदरे सोडले तर सगळेच बदलून गेलेले आहे हा तर पुण्याच्या भागातला कळसच.

आपण केलेला आत्महत्येचा प्रयत्न आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी केलेला त्रास झालेला त्रास घरच्यांचा आणि मित्रांची साथ आणि त्या सुमारास लागलेली लिखाणाची आवड अतिशय शिक्षण या पद्धतीने सांगितले आहे. विकसनशील देशांमध्ये आपण लोक राजकारण, अर्थव्यवस्था, जातीयता आणि बदलत्या तंत्रज्ञानाला वैयक्तिक पातळीवर कसे बळी पडतो. आणि सोप्या सोप्या गोष्टी कशा आत्मसात करतो. वाचन सोडून देऊन टीव्ही इंटरनेट याचा आपल्या जीवनात कसा शिरकाव झालेला आहे हे अतिशय योग्य पद्धतीने स्पष्ट केलेले आहे.

नाईन्टीन नाईन्टी ह्या पुस्तकामध्ये अतिशय सोप्या भाषेत पण ओघवत्या शैलीत मनाला जड वाटणारे काही काही विचार त्यांनी आपल्या डोक्यात सोडलेले आहेत.

Untitled

सब कुछ पता होकर पुछना गवारा नहीं मुझसे मेरी जान मांगना गवारा नही
वो क्या जाने दर्दे दिल के शिकवे को हम उन्ही मैं अपना जहां बुनते रहे

मुकद्दर मैं क्या है क्या नही किसे पता
ना जानने की कोशिश है ना पाने की आस है
मुझे तो बस जिंदगी जी भरले जीना है
राह पे चलना है
मंजिल किसे पता… कहाँ लेख जाये….

 

मेरी जिंदगी में खुशियां तेरे बहाने से है….

आधी तुझे सताने से है, आधी तुझे मनाने से है ।

प्रवर्ग: Uncategorized

प्रश्न

प्रश्न प्रश्न नुसतेच प्रश्न
सकाळी प्रश्न रात्री प्रश्न
दिवसभर प्रश्नच प्रश्न

हे करु का ? ते करु?
इथ जाऊ का तिथे जाऊ ?
काय चुक काय बरोबर
माहिती नाही मला काही

प्रश्न प्रश्न प्रश्नांचे मोठे भांडार
समोर मला दिसते
उत्तरासाठी मन सैरावैरा धावते

प्रत्येक प्रश्न माझ्यासमोर हसत उभा राहतो
माझे उत्तर काय? हे विचारत राहतो
हसणा-या या प्रश्नांची मला भिती वाटते
चुकीच्या उत्तराची धास्ती वाटते

म्हणून माझ्या प्रश्नांना उत्तर मिळत नाही
प्रश्न माझ्यासमोरचे संपत नाही
जुन्या प्रश्नाचे उत्तर मिळेपर्यंत
नविन प्रश्न उभा राहतो.

प्रवर्ग: Uncategorized

सकाळची वेळ

आज सकाळी नाही पहाटे खूप लवकर जाग आली. अहो लवकर म्हणजे पहाटे ५.०० वाजता ! खूप प्रयत्न करुनपण झोप लागत नव्हती म्हणून उठलो. आता ५ वाजता उठून काय करायचे ह्या विचारात होतो. इंजिनियरींगला असताना PL मध्ये पहाटे २ वाजता उठून अभ्यास केला होता मी. तसेच शेवट्या सेमिस्टरला प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठीपण मी पहाटे लवकर उठत होतो. माझे हे असेच आहे. सगळे Software Engineer रात्र-रात्र जागतात पण मला रात्री जागताच येत नाही किंवा रात्री जागुन काम होत नाही. पहाटे लवकर उठले की माझी सर्व कामे फटाफट होतात. बरं विषयांतर भरपूर झाले.

तर आता सकाळी ५ वाजता उठुन काय करायचे या विचारात असतानाच काहीतरी वाचण्याची लहर आली. शेवटी Computer Engineer म्हणल्यावर Java Programming चे पुस्तक काढून वाचत बसलो. खरं अभ्यासाचे टेंशन नसताना वाचलेले सगळे चांगले लक्षात राहते हे आज मला कळाले. ते जुने दिवस आठवले, रात्र-रात्र जागून केलेला अभ्यास आठवला.

आता जुन्या दिवसाप्रमणे सुरुवात झाली होती म्हणून त्यप्रमाणे ६ वाजता बाहेर फिरायला निघालो. सकाळी फिरायला जाण्याची सवय मला बाबांनी लावली. इकडे मुंबईला आल्यावर माझी ही सवय सुटली. (त्यासाठी मी रोज बाबांची बोलणी खातोय तो भाग वेगळा ! ) सकाळी घरातून बाहेर पडल्यावर मला स्कूल बसची वाट बघत उभी असलेली काही मुले-मुली दिसली. मीपण शाळेत जाण्यासाठी असाच रोज स्कूल बसची वाट बघत उभा रहायचॊ. माझी आजी मला रोज सोडायला येत असायची. खरंच ते दिवस आठवले. असेच एका दिवशी माझ्या मागे एक कुत्रा लागला, मी पुढे, तो मागे असे आम्ही कॉलनीभर फिरलो होतो. ज्या दिवशी माझी परिक्षा असेल त्या दिवशी बाबा मला सोडवायला यायचे.आणि बस येईपर्यंत आमची उजळणी चालायची. जर मी चुकलो तर त्यांची टपली ही ठरलेली असायची.

सकाळी लवकर उठल्यावर किती गोष्टींची आठवण येते !

ऑफिसमध्ये ट्विटर(Twitter) वापरायचे आहे?

ऑफिसमध्ये ट्विटर(Twitter) वापरायचे आहे? आणि तुमच्या System Administer ने जर ट्विटर प्रतिबंधित केलेले असेल तर ते कसे वापरायचे? माझ्या जुन्या ऑफिसमध्ये ट्विटर हे चालू होते. त्यामुळे ट्विटरचे एक व्यसन लागले होते. अगदी खुप छोट्या छोट्या गोष्टीपण आम्ही ट्विट करायचो. “चहा प्यायला चल” हे पण आम्ही पर्सनल मेसेज (@username) वापरुन सांगायचो. पण नंतर नोकरी बदली व दुसर्‍या कंपनीत रुजु झालो.

आणि हाय! पहिल्याच दिवशी HR नी ३-४ धडाधड मेल पाठवले. त्यातील एका मेल मध्ये Internet Usage Rule म्हणून एक फाईल होती आणि त्यात “Banned Social Networking Sites” मध्ये ट्विटरचे नाव होते. आणि त्यादिवसापासून माझ्या आणि ट्विटरमध्ये एक दुरावा निर्माण झाला होता. पण हार मान्य करणार मी? शक्यच नाही. आणि त्या दिवसापासून माझा शोध चालु झाला.

गुगलकाका हे मदत करायला तयार होते. फारयफॉक्स इकोफोन हे एक्स्टेशन वापरुन पाहिले. पण इकोफोन हे ट्विटरला कनेक्ट होत असल्यामुळे मला त्याचा काहीही उपयोग होत नव्हता. मला काहीतरी अशी सर्विस हवी होती की मी दुसर्‍या कुठल्याही सर्वरला कनेक्ट होणार व तो सर्वर माझ्यासाठी माझ्या ट्विट मला मेल करणार किंवा चॅट मधून पाठवणार. सगळीकडे शोधल्यावर मला tweet.im ही साईट सापडली.

“Control your Twitter with your instant messenger”

हे बोधवाक्य पहिल्या पानावर पाहिले! आणि म्हणालो. अरे वा! मझे तर कामच झाले.

हे tweet.im सर्विसचे work flow आहे.

म्हणजे जर तुमच्याकडे जर गुगल टॉक चे अकाउंट असेल तर ही सर्विस तुम्ही लगेच वापरू शकतात. ही सर्विस वापरण्याआधी तुम्हाला २ गोष्टी कराव्या लागतील.

१) tweet.im वर गेल्यावर तिथे असलेल्या १ लिंकवरुन तुम्हला तुमच्या ट्विटरच्या अकाउंटमध्ये Sign In करावे लागेल. ही अतिशय सुरक्षित आहे. Oauth ही नवीन Technology वापरली आहे. त्यामुळे तुमचे युझरनेम व पासवर्ड सुरक्षित राहतो.
२) आता तुम्हाला तुमचा गुगल टॉकचा इमेल देउन रजिस्टर या बटनावर क्लिक केले की झाले तुमचे काम.

तुमच्या चॅटलिस्टमध्ये तुम्हाला तुमच्या ट्विटरच्या युझरनेम ने एक Friend Request येईल. व ही request accept केल्यावर तुम्हाला तुमचे ट्विटर चॅट मधून वापरता येईल.

आता हे वापरायचे कसे??
१) संदेश — हा संदेश असा की जो तुम्हाला ट्विट करायचा आहे.
२) @username संदेश — असा संदेश जो तुम्हाला एखाद्या युझरला रिप्लाय म्हणुन द्यायचा आहे. आणि तो सर्वजण पाहु शकतात.
३) d username message — एखाद्या युझरला डायरेक्ट संदेश पाठवण्यासाठी.
४) f username — या युझरला follow करा.
५) u username — या युझरला follow करू नका.
६) ing — तुम्ही follow करणार्‍या युझरची यादी.
७) ers — तुम्हाला follow करणार्‍या युझरची यादी.

मग आहे ना मस्त ही सर्विस! आता मग ही सर्विस वापरुन कोण मला follow करणार व संदेश पाठवणार?

शेवटी माझ्या नवीन ऑफिसच्या System Administrator ची जिरली. आणि मलापण System Administrator जिरवण्यात खूप मजा येते.

तुम्हालापण असा अनुभव येतो का?

मार्च 2, 2010 11 comments

माणसाचे मन हे खुप अजब वस्तु आहे. इथे मी मनाला शरीराचा भाग म्हणणार नाही. कारण माझ्यामते मन हे विचारांचा भाग आहे. कारण मन हे कधीच कोणाला दिसले नाही किंवा दाखवता येत नाही. पण काही-काही वेळेस मन हे खूप त्रास देते. आपण ब-याचदा म्हणतो की मन था-यावर नाहीये. म्हणून मला असे वाटते की मन हा एक विचारांचा भाग आहे. शेवटी बहीणाबाईंनी लिहून ठेवलेलेच आहे.

मन पाखरू पाखरू
त्याची काय सांगू मात
आता व्हत भुइवर
गेल गेल आभायात

ह्या मनाचॆ अजुन एक वैशिष्ट म्हणजे पुढे घडणा-या घटनांची चाहुल लागणे. आपली एखादी प्रिय व्यक्ती, वस्तू किंवा जी गोष्ट आपल्याला मनापासुन हवी असते त्याबाबतची एखादी घटना(बहुतेककरुन वाईट, अप्रिय) ह्याची चाहुल देणे. १ वर्षापूर्वी माझा या गोष्टीवर विश्वास नव्हता. माझी आजी, वडिल मला कधीतरी त्यांना आलेल्या अश्या अनुभवाविषयी सांगायचे पण मी ती गोष्ट हसण्यावारी उडवायचो. असे होणे शक्य नाही. तुम्ही मग देवच आहात असे बरेच काही त्यांना बोलायचो. जवळपास १ वर्षापूर्वी मी डायरी लिहणे चालू केले. आणि आज त्यातील काही घटना परत-परत वाचून बघताना मला असे जाणवले की मलापण पुढे घडणा-या घटनांची चाहुल लागत होती पण मला याची जाणीव नव्हती. आणि आत्ता घडलेल्य़ा काही घटनांनी ही जाणीव अधिक तीव्र केली.

यातील पहिली घटना ह्या शुक्रवारी घडली. शुक्रवारी सकाळपासून मला खूप अस्वस्थ वाटत होते. डोकेपण दुखत होते. कामात पण लक्ष लागत नव्हते. सारख्या चुका होत होत्या. दर शुक्रवारी मी प्रगती एक्सप्रेसनी घरी जाणारा मी, पण त्यादिवशी माझी प्रगती चुकली. डेक्कन क्विनमध्येपण बसायला जागा मिळाली नाही. डोके दुखत होते म्हणून कर्जतला चहा प्यायला खाली उतरलो तर १०० रु. सुट्टे नाहीत म्हणुन चहा मिळाला नाही. तसाच कसातरी घरी आलो. घरी आल्यावर भावाने सांगितले की आजीला सकाळी ICU मध्ये Admit केले. मग मी तसाच हॉस्पिटलमध्ये. आजीला सकाळी Admit केले व सकाळपासून मला अस्वस्थ वाटत होते, हा योगायोग होता की मला या घटनेची आधीच चाहुल लागली होती?

दुसरी घटनापण शुक्रवारी घडली ५ फेब्रुवारी, खरं तर आदल्यादिवसापासुनच मला अस्वस्थ वाटत होते.

काहीतरी हातातून निसटून चालले आहे पण मलाच कळत नाहीये काय आहे ते ? कसे पकडावे?

हे माझे पेटंट फिलिंग आहे. ह्याची सारखी जाणीव होत होती. संध्याकाळी ५ वाजण्याच्या सुमारास ही जाणीव इतकी तीव्र झाली की मला एका जागेवर बसणेपण अशक्य झाले. शेवटी ऑफिसमधून एकटाच बाहेर पडलो व १५-२० मिनिटे नुसतच जवळ्च्या बागेत फिरलो. आणि शेवटी थोडे बरे वाटायला लागल्यावर परत ऑफिसमध्ये आलो. जी-मेलला लॉगिन केल्यावर १ मेल दिसला. वास्तविक तो मेल मला अपेक्षित होता. त्याच दिवशी तो येणार होता. पण तो मेल माझ्या अपेक्षेप्रमाणॆ आला नाही. वास्तविक तो मेल सकारात्मक यावा अशी माझी इच्छा होती. पण तो मेल नकारात्मक आला. जी माझी मनापासुनची इच्छा होती ती पुर्ण झाली नाही. हा पण योगायोग का?

तिसरी घटना मागच्या वर्षी गणपती उत्सवात घडली. माझ्याकडे Nike चे खुप चांगले बुट होते. गणपती उत्सवात आम्ही सहकुटुंब दगडुशेट हलवाई गणपतीच्या दर्शनाला गेलॊ असताना माझे हे Nike चे बूट चोरीला गेले. वास्ताविक मला आदल्यादिवसापासून अस्वस्थ वाटट होते.आणि या दिवशीपण शुक्रवार होता.

डायरी लिहायला लागल्यावर मला या गोष्टी जाणवायला लागल्या. सिक्स्थ सेन्स वगैरे काय म्हणतात ते हेच का? आणि दरवेळेस शुक्रवार का? याचे उत्तर अजुन मला सापडलेले नाही.

पाने सतिशच्या डायरीची भाग १ (लव्ह आज-कल)

फेब्रुवारी 17, 2010 7 comments

“अरे आज १२.०० वाजले तरी मला झोप का लागत नाहीये ?” बिछाण्यावर पडल्या-पडल्या सतिश पुटपुटला. सतिश जोशी बंगळूरला Google मध्ये काम करणारा. हा सतिश सकाळी ९.०० ते रात्री ९.०० असे १२ तास ऑफिसमध्येच असतो. आणि मग रात्री रुमवर येउन झोपतो. कधीतरी कंटाळा आल्यावर त्याच्या लॅपटॉपवर movies बघणे त्याचा आवडाता छंद ! असे हे सतिशचे वेळापत्रक खूप साधे आहे. आजपण सतिश लव्ह आज-कल हा movie बघुन झोपला(झोपण्याचा प्रयत्न करत) होता. पण त्याला झोप लागत नव्हती.
“आता आपण काहीतरी लिहुनच काढु. कारण मनातल्या या विचारांचा निचरा झाल्याशिवाय झोप लागणे अशक्यच आहे. एवढ्याश्या मनात किती साठवायचे ? दरवेळेस काही घडले, कुठला विचार मनात आला, आनंद झाला, दु:ख झाले, एखाद्याचा खुप राग आला इथपासून ते एखादी मुलगी खुप आवडली इथपर्यंतचे सगळे विचार भावना आपण zip करतो आणि मनाच्या कुठल्यातरी
कोप-यात save करतो. आणि मग कधीतरी अशी एखादी घटना घडते आणि एखादी zip file अलगत उघडते आणि मग ती zip file, ती आठवण अशीच त्रास देत राहते. आज पण अशी एखादी zip file उघडली आहे का ? लव्ह आज-कल movie बघून अंजलीची zip file उघडली असली पाहिजेल. कारण आज तिची खूप आठवण येत आहे. movie बघताना पण मला तिची आठवण येत होती. काहीतरी हातातून निसटून चालले आहे आणि ते पकडता येत नाहीये ही जाणीव सारखी होत होती. आता काहीतरी लिहिल्याशिवाय ही zip file बंद होणार नाहीये आणि मला झोप पण लागणार नाहीये.” असा विचार करून सतिश उठला. अंधारात ठेचाळला, लाईट लावली बॅगेतून कंपनीची डायरी काढली व लिहायला सुरुवात केली.

११ नोव्हेंबर २००९
आज लव्ह आज-कल हा चित्रपट मी परत बघितला. गेल्या १ महिण्यात किमान ४-५ वेळा मी हा चित्रपट पाहिला आहे. तर त्याचे काही शॉटस तर मी ब-याचदा बघितले आहेत. मलाच कळत नाही हा चित्रपट मी सारखा-सारखा का बघतो? आणि विशेष म्हणजे सतत नवीन काम करण्याची इच्छा असणारा मी, हा एकच चित्रपट का सारखा-सारखा का बघतोय? पण हा चित्रपट बघताना मनाला जी एक प्रकारची हूरहूर लागते ती वेगळीच असते. काहीतरी हातातून निसटून चालले आहे पण मलाच कळत नाहीये काय आहे ते ? कसे पकडावे?
या चित्रपटाचा दुसरा भाग अगदी माझ्या जीवनात आत्ता घडतो आहे असॆ वाटते आहे. सैफ अली खान(जय) सारखी google ambition मनात ठेउन मी अभ्यास केला. आणि इथे आलो. पण इथे मला सारखी अंजलीची आठवण येत आहे. जय पण golden gate मध्ये जॉईन झाल्यावर त्याच्या मनाची जी स्थिती सुरुवातीला असते तशीच माझी पण होती सुरुवातीला google मध्ये काम करताना पण आता सगळे बदलले आहे. घरी असताना आई, बाबा, विरु यांच्याबरोबर वेळ जात होता पण इथे आल्यापासुन या एकटेपणाचा कंटाळा आलेला आहे. पूर्ण दिवस ऑफिसमध्ये चांगला जातो. पण रात्री खूप त्रास होतो. सारखी-सारखी तिची आठवण येते आहे. खरं तर ज्या दिवशी मला कळाले ती माझ्यापेक्षा वयाने मोठी आहे त्या दिवशी मी तिचा विचार सोडुन द्यायचे ठरवले होते. पण या चित्रपटाने माझ्या या जखमेवरची खपलीच काढली आणि आज भळभळत रक्त वाहू लागले आहे.
खरंच मला तिची आता खूप आठवण येतेय.माझ्या प्रत्येक गोष्टीत मला तिचे अस्तित्व जाणवते. मी आनंदी असलो तरी मला तिची आठवण येते तसेच मला खूप दुःख झाले तरी ! मी नाराज निराश असताना मला ती आठवते तसेच मी खुप खूष असलो तरी. मी आजारी असताना पण तिची आठवण येते. घरात काही कार्यक्रम असला तर तिची आठवण येते. प्रत्येक सणाच्या दिवशी तिची आठवण येते. घरात पुजा असली तरी ती मला दिसते. अगदी एखादी चांगली साडी दिसली तर या साडीत ती कशी दिसेल? हाच विचार माझ्या मनात येतो.माझ्या प्रत्येक गोष्टीत मला तिचे अस्तित्व जाणवते.
ती मला १ वर्षापूर्वी एका क्लासमध्ये भेटली होती. पण अजून पण तिचा विचार माझ्या डोक्यातून जात नाहीये. ती माझ्यापेक्षा मोठी आहे हे माहिती असुनसुद्धा ती मला आवडते. खरंच हे प्रेम आहे का ? मलाच कळत नाहीये काय ते?
आताच तिचा वाढदिवस झाला. मी तिला शुभेच्छांचा मेल पाठवला पण तिचा नुसता थॅंक्स म्हणुन पण रिप्लाय आला नाही.
खरच ती मला अजुन ऒळखत असेल का ? ?

ह्या छोट्या-छोट्या गोष्टींचा आनंद घ्या !!

फेब्रुवारी 10, 2010 4 comments

दररोज कार्यालयात येताना रस्त्यावरच्या व्यक्तींचे निरिक्षण करणे हा माझा आवडता छंद आहे. माझे घर ते कार्यालय हे अंतर चालत १५ मिनिटांचे आहे. पण रमत-गमत चालताना मला बरोबर अर्धा तास लगतो. माझ्या या रोजच्या प्रवासात मला भरपुर वेगवेगळ्या प्रकारच्या व्यक्ती दिसतात. खरं तर मुंबईमध्ये प्रत्येक व्यक्तीच्या चेह-यावर घाईच दिसते.पण नीट निरिक्षण केले तर त्या चेह-यामागे बरेच काही दडलेले असते.

मला दररोज सकाळी जास्त संख्येने दिसतात त्या मुलांना शाळेत सोडणा-या आया. खरं मला या जोडीगोळींचे निरिक्षण करायला खूप आवडते. रस्त्याने चाललेली ही जोडी ! ब-याचदा बोटाशी धरलेले ३री – ४थी पर्यंतचे लहान मूल, पाठीवर त्या मुलाची बॅग, मुलाची चाललेली अखंड बडबड. आणि त्याच्या आईचे त्याच्या बडबडीकडे असलेले दूर्लक्ष. थोड्या – फार फरकाने मला हेच दॄश्य दिसते.

त्या मुलाची अखंड बडबड चालू असते. पण तो एकटच बडबड नसतो. तो ते सगळे त्याच्या आईला सांगत असतो. पण त्याच्या आईचे त्याच्याकडे लक्ष नसते. एक तर ती स्व:त कोणत्या तरी विचारात गर्क असते किंवा तिच्या मुलाच्या मित्रांच्या आयांबरोबर गप्पात मग्न असते. तिचे त्या मुलाच्या बडबडीकडे लक्षच नसते. त्या मुलाची बडबड चालू असते. तो ब-यचदा आईच्या रिस्पॉन्ससाठी थांबतो, पण आईचे लक्ष नसते म्हनूण हिरमुसतो, व मस्ती करायला चालू करतो की जेणेकरुण आई लक्ष देईल. पण ब-यचदा आईला हे कळत नाही व ती त्याला रागवते किंवा मारते.

बर त्या मुलाची फक्त प्रतिसादाची अपेक्षा असते. तुम्ही त्याविषयात लक्ष घालावे असे त्याला वाटत नसते. तुमच्या फक्त हुंकार पण त्या लहानग्याला पुरेसा असतो. त्या फक्त हुंकारामुळे त्याला एक आत्मविश्वास येतो. आपली आई आपले म्हणणे ऎकत आहे. ती आपल्या पाठीशी आहे याची जाणीव होते.

खर ह्या लहान मुलांची बडबड ऎकण्यात खुप मजा येते. त्याच्या बडबडीचे विषय हे बर्‍याचदा हे शाळेतल्या गमती-जमती, घरातले पाळीव प्राणी, घरातले नातेवाईक अशीच असते. बर्‍याचदा ही बडबड ही संदर्भहीन असते पण काहीवेळा काहीतरी मोठ्ठा विचार सांगुन जाते.

माझे सांगणे इतकेच आहे की आपण दिवसभर आपल्या कामात असतो. खूप टेंशन असतात. हे सगळे मान्य. पण सकाळचा हा वेळ त्या लहान मुलाला द्या. त्याचे म्हणणे नुसते ऎका, त्याला प्रतिसाद द्या. तो पण खूष होईल आणि त्याच्या चेहर्‍यावरचा आनंद बघुन आपल्याला पण समाधान वाटेल. त्या लहान मुलाला आत्मविश्वास मिळेल की आपले म्हणणे कॊणीतरी ऎकत आहे. आणि हे मोठे विधान ठरेल, पण या १०वी – १२वी च्या मुलांच्या आत्महत्या रोखण्याच्या दृष्टीने आपण एक पाऊल टाकलेले असेल.

    शेवटी आयुष्य हे सुंदर आहे त्याला अजून सुंदर बनवा.

3 – इडियट आणि मी

फेब्रुवारी 9, 2010 6 comments

काल मी ३-इडियट हा चित्रपट पाहिला. खरे तर हा चित्रपट बघयला मी खुप उशीर केला, पण काय करणार माहिती-तंत्रज्ञन क्षेत्रात काम करताना सुट्टी खुप कमी मिळले. बरं तो विषय बाजुला राहु द्या. बर हा चित्रपट बघायला जाताना मी थोडासा bias होतो. कारण ह्या चित्रपटाची जितकी चांगली प्रसिद्धी ऐकली तितकी वाईट. त्यातील रॅगिंगचे, आत्महत्येचे आणि शिक्षकांशी केलेल्या चेष्टेचे दृश्ये आधिच वादग्रस्त ठरली होती.
खरं तर हा चित्रपट ज्यांनी पाहिला त्यांनी त्यांच्याप्रमाने अर्थ लावला. मीपण इथे लिहणार आहे ती मते माझी स्व:ताची आहेत. हा चित्रपट सुरु होतो तो एका रॅगिंगच्या दृश्य्याने ! खरं तर कोणत्याही अडचणीच्यावेळी शिकलेल्या ज्ञानाचा उपयोग करुन अडचणींवर मात करता येते हे माहिती असुन कधी आम्ही वापरले नव्ह्ते. पहिले दृश्य हेच शिकवते. इथे रॅंचो ने जी युक्ती वापरली आहे. ती इयत्ता ५वी च्या मुलाला पण माहिती आहे. पण आम्ही ती कधी आमलात आणत नव्ह्तो. कारण आम्ही घाबरतो. आणि विचार करत नाही. इथे पहिला धडा मिळतो तो शिक्षणाचा व्यवरात उपयोग करण्याचा.
दुसरी या चित्रपटने शिकवलेली गोष्ट म्हणजे की कोणतीही गोष्ट अपूर्ण सोडु नका. कारण तुम्ही ती गोष्ट पुर्ण करण्याच्या जवळ असू शकतात, Joy च्या पात्राने सोडुन दिलेला प्रोजेक्ट हा पूर्ण झालेला होता. पण त्याने त्याचा विचार केला नाही. आता मला ह्या गोष्टीला जबाबदार कोण ह्या वादात पडायचे नाही. पण हा प्रसंग मला ही गोष्ट शिकवुन गेला.
तिसरी गोष्ट आणि माझ्यामते चित्रपट्चा मुख्य विषय हा की कोणताही गोष्ट ही केवळ करायची म्हणून करु नका. मला वाटते की या चित्रपटाने सगळ्यात मोठा वार केला तो आजकालच्या अभ्यास पद्धतीवर रट्टा मारु पाठांतर संस्कृती हीच अभ्यासाची पद्धत आजकाल आहे. “आमच्यावेळी असे नव्हते” असे म्हणण्या इतका मी मोठ्ठा नाही. आणि बारावी पास होईपर्यंत मीपण असाच अभ्यास केला होता. पण इंजिनीअरिंगला एक झटका खाल्यावर मला या रट्टा मारु पाठांतर अभ्यास पद्धतीचा उपयोग नाही हे जाणवले व मी ही अभ्यास पद्धत बदलली आणि मला त्याचा खुप फायदा झाला. चतुरचे पात्र हेच दर्शवते.अर्थ न समजता केलेल्या पाठंतरामुऴे होणारी फजिती हेच चतुरच्या बाबतीत दाखवलेले आहे.
या चित्रपटावर अजुन एक आरोप म्हणजे की या चित्रपटामुळे आत्महत्येच्या प्रकारात वाढ झाली आहे. हे काही अंशी खरे असले तरी या आत्महत्या रोखण्याचा उपाय सांगितला आहे. फरहान जेव्हा आपल्या वडिलांना जेव्हा त्याला करायचे आहे हे सांगयला जातो तेव्हा तो वडिलांना त्याचे पाकिट दाखवतो. पाकिटात त्याच्या आई-वडिलांचा फोटो असतो आणि ह्या फोटोकडे बघुन आत्महत्या करु नको असे रॅंचोने सांगितले आहे, असे सांगतो. मला वाटते की हा उपाय कोणालाही आत्महत्येपासून रोखु शकेल.
अजून एक रॅंचोने सांगितले की तुम्ही जी गोष्ट आवडते किंवा जी गोष्ट तुम्ही चांगल्या पद्धतीने करु शकतात तेच काम करा. यातच तुमची प्रगती आहे. आणि ह्यातच तुम्हाला निश्चित आनंद मिळेल. पण मला असे नाही वाटत कारण मी कोणती गोष्ट चांगल्या पद्धतीने करु शकतो किंवा मला काय आवडते हेच मला अजुन कळाले नाही. मग मी काय करु? मला वाटते याचे उत्तर पण हा चित्रपट देतो. अश्यावेळी सरळ धोपट मार्गाने अभ्यास करा व चांगली नोकरी करा. जसे राजु ने केले.
बाकी चित्रपट खूप चांगला ! सगळ्यांच्या भुमिकापण चांगल्या परंतू करिनाला काहिच काम नाही. मला वाटते की फक्त आमिरसाठी तिने हा रोल केला. इत्यादी इत्यादी इत्यादी ……..
पण एक मात्र खरे की काल रात्री मला झोप लागली नाही. माझे संपूर्ण college life माझ्या डोक्यात घुमत होते. मी काय काय केले आणि आता काय काय करायला हवे याचा विचार चालू होता. पण हा चित्रपट खुप चांगला आहे. एखाद्याचे विचार बदलण्याचे सामर्थ्य ह्या चित्रपटात आहे. ह्या चित्रपटाच्या प्रत्येक दृश्याला म्हणावसे वाटते

जहॉंपना तुस्सी ग्रेट हो !!!